Sunday, 29 October 2017

डेड ब्रेन -प्रवीन सुरवसे


                               डेड ब्रेन              

           पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.
 शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुम मधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते."सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरूवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो  जवळजवळ 'ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत."
 ‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट ! मी डॉक्‍टरना विचारले की, "आता काय स्‍टेटस आहे? " त्‍यांनी सांगितले की, "सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवली व व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत." सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.) "सर, मी ब्रेन चा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे."
 मी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्‍पा म्‍हणाले "मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल!" सगळेचजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, "काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो." मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घूसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, "सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय." लिफ्‍टसाठी न थांबताच जीना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला  होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता.
 नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते.मी त्‍यांना म्‍हणालो," पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षा कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्‍ही ठरवा ! "
 नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं!ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो," पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या." आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.
 जनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉन ने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं, तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्‍यरॉन्‍सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते(मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार )होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, "ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो." ऑपरेशन थिएटर मधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये घेतला जात नाही, परंतु इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो.पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वास्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍या पासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.
 ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतु अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती.आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.
ते म्‍हणाले, " सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो , परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे."
 मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार.म्‍हणून मी एक युक्ती केली.जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती.
 आता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, " सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या."  मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो.
 आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची! मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो.  या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले.तोच काय तो आधार होता! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले," सर, लवकर चला. पेशंटला बघा चला." मी लगेचच जावून पाहिलं तर काय चमत्‍कार ! त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती.
 माझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.
 त्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. "मी प्रयत्न करतो!" या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली? मग मी त्‍यांना सांगितले की, पेशंट ज्‍या वेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहीनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढुन घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते.
पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनी ही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वर चरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य ! मी  केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव  पूर्णपणे  निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या  ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.
आता त्याच्या आई-वडीलांना आय.सी.यू. मध्ये बोलाऊन घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना? तर तो म्हणाला, " यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड." आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यांतील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून  ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. "ही इज अ बॉर्न फायटर!
तुमचा मुलगा सुखरूप परत आला!"आणि आम्‍ही लढाई जिंकली होती! एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा  पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती

हॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिश्चार्ज होऊन घरी जाताना  त्याने मला आश्वासन दिले की,इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.

खरच ! आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात !
                     

                       

 
                             डॉ.प्रवीण सुरवसे          कन्‍सल्‍टंट न्यूरोसर्जन            कोलंबिया एशियान             पुणे फोन ः७७३८१२००६                                      माहीती संकलन -          सारंग पाटील फोन 09922080899
sp355847@gmail.com

Monday, 23 October 2017

ताईस भेट



बाबांचा हात धरून खूप अधीर होऊन ती हॉस्पिटल च्या पायऱ्या चढत होती.
कधी एकदा बाळा ला पाहतेय असे तिला झाले होते. जेंव्हा पासून आई च्या पोटात बाळ आहे हे कळले तेंव्हा पासूनच ती खुप excite झाली होती. कधी एकदा बाळ आई च्या पोटातून आपल्या मांडीत येतेय असे तिला झाले होते. आणि आता तो क्षण आला होता. आत्ताच बाबांनी गोड बातमी दिली होती की ती ताई झालीय. हॉस्पिटल मध्ये शिरताच ती धावत सुटली. आई च्या कुशीत झोपलेल्या इवल्या इवल्या गुलाबी रंगाच्या छोट्या बाहुल्या सारख्या आपल्या भावाकडे पाहून हरखून गेली .आई ने अगदी अलगद पणे तिच्या मांडीत दिले आणि तिने पण हळुवार पणे आपल्या इवल्या हातांनी सांभाळत त्याला जवळ घेतले.त्या दिवशी पासून तीच्या छोट्याश्या भावविश्वाचा भाऊ अविभाज्य भाग झाला. आई बाळाला घरी घेऊन आल्यावर छोट्याश्या ताई ने बाळा ची सगळी जबाबदारी आपल्या इवल्याश्या खांद्यावर घेतली.बाळाच्या दुपट्यांच्या घड्या घालणे,आंघोळीची तयारी करून देणे सगळी कामे अगदी तन्मयतेने करत असे.
पाहता पाहता बाळ मोठा होऊ लागला
व आपल्या ताई चे शेपुटच झाला. ताईम् वाक्यम प्रमाणं.आधी ताई नंतर आई बाबा. शाळेत जाताना ताई चा हात धरून जायचे. ताई ने सांगितले मस्ती नाही करायची तर मुकाट्याने राहायचे.ताई च्या जवळ अभ्यासाला बसायचे.बरे नसले तरी आई पेक्षा ताई च जवळ हवी वाटायची त्याला. हळू हळू ही जोडगोळी मोठी होऊ लागली. आपापल्या विश्वात रममाण होऊ लागली.तरी पण रात्रीच्या वेळी एकमेकांशी दिवसभरातल्या गोष्टी सांगितल्या शिवाय दोघांना झोप लागत नसे.भले बुरे जीवनाचे धडे ताई कडून घेत भाऊ मोठा होत होता.कशाची ही शंका आली तरी उत्तर म्हणून फक्त ताईच होती त्याच्यासाठी. प्रत्त्येक भाऊबीज प्रत्त्येक राखी पौर्णिमा दोघांचे प्रेमाचे नाते अजूनच उमलवत होते.
ताईच पहिल्यापासून भावाला गिफ्ट देत होती. आधी कधी खाऊ चे पैसे साठवून तर कधी शिकवण्या घेवून. भावासाठी त्याची ताई खूप श्रीमंत होती. मनाने पण आणि पैशाने पण.ताई ला नुकतीच नोकरी लागली होती त्यामुळे तर भावाच्या इंजिनीरिंग ला सहजच ग्रीन सिग्नल मिळाला होता. आई बाबांच्या पाठीशी ताई भक्कम उभी होती.दोघा भावंडाना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे की ताईचे लग्न झाल्यावर काय होईल असा प्रश्न आई बाबांना नेहमी पडायचा.
अन ती योग्य वेळ लवकरच आली.एक छान कर्तबगार राजपुत्र ताईच्या आयुष्यात आला.भाऊ सुरवातीला आपल्यातला वाटेकरी समजून नाराज झाला पण ताई ला खुश बघून आनंदला बिचारा.ताई ला चिडवण्यात तिच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त झाला. दिवस कसे भुर्रकन उडून जात होते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम लाडक्या भाऊजीनी ओळखले होते.शक्य तेवढे ते त्यांच्या भावविश्वात ढवळाढवळ करत नसत.
बघता बघता ताई आपल्या संसारात आणि भाऊ आपल्या अभ्यासात गुंतून गेले.पण रात्री फोन केल्या शिवाय दोन मिनिटे बोलल्या शिवाय दोघांना चैन पडत नसे.एखादे पुस्तक विकत घ्यायचे आहे किंवा मित्रांबरोबर ट्रिप ला जायचे असेल अजून ही त्याची ताई त्याच्यासाठी श्रीमंतच होती.
बघता बघता भाऊ इंजिनिअर झाला.आई बाबा नोकरी कर म्हणून मागे लागले होते.पण भावा ची पुढे शिकायची इच्छा ताई च्या नजरेतून सुटली नव्हती. खर तर तिचा ही संसार वाढत होता, जबाबदाऱ्या वाढत होत्या. पण शेवटी छोट्या छोट्या अडचणींना मात देत बहिणी चे प्रेम जिंकले होते. थोडे लोन घेऊन ,थोडे कर्ज काढून , थोड्या गरजा कमी करत सासरची नाराजी पत्करत ताई चा भाऊ आपले अवकाश गाठायला गेला सुद्धा.काही वर्षे जरा अडचणीची गेली. परदेशात राहून अतिशय तन्मयतेने भाऊ अभ्यास करत होता.अभ्यासाचे टेंशन कमी पण ताई पासून दूर राहायचे जास्त होते त्याच्यासाठी.बघत बघत दोन तीन वर्षे पार पडली. भावाला तिकडेच नोकरी लागली.काही वर्षात ग्रीन कार्ड पण मिळाले. एकदा इथे येऊन ताई च्या पसंती ने लग्न करून पत्नी सह तिकडेच स्थिरावला. ताई भावाला आनंदी पाहून खुश होत होती. आता येणे जाणे जरा कमी झाले होते.
 तरीही भाऊबीज म्हणून अजूनही तिच्या हातचा दिवाळी चा फराळ पार्सल होत होता.आई बाबांच्या शेवटच्या दिवसात 4 दिवसासाठी आला तिच्या मांडीत हामसून हामसून रडून गेला जसा लहान असताना रडायचा. तिने ठरवले होते आता सांगावे त्याला रहा इथेच .. जाऊ नकोस परत इतक्या लांब. मला तरी कोण आहे आता तुझ्याशिवाय. पण त्याच्या पत्नी च्या नजरेतील कोरडे पणा पाहून तीे त्याला काही बोलली नाही.
दिवस जात होते.अचानक नवऱ्याचे आजारपण सुरू झाले.त्याच्या टेस्ट, त्याची सेवा शुश्रूषा यात ती बुडून गेली. गेली दोन वर्षे सतत किडनीच्या आजाराने नवरा त्रस्त होता.त्याचे आजारपण, घर संसार , मुलांची शिक्षण सगळे करताना ओढाताण होऊ लागली.सासरचे आडून आडून चौकशी करत भाऊ परदेशात एवढा खोऱ्याने कमावतो , आतापर्यंत बहिणीच्या जीवावर एवढी मजल मारली आता कुठे आहे. बहिणी ची काहीच कशी काळजी नाही.बहिणी ची काहीच कशी काळजी नाही. भावाला त्रास नको म्हणून तिने त्याला काही कळवलेच नव्हते.
एकदिवस डॉक्टरांनी निर्वाणी चे सांगितले की किडनी ट्रान्सप्लांट केल्याशिवाय पर्याय नाही. ताई मटकन खालीच बसली.पैशाची कशीबशी सोय केली होती पण किडनी मिळत नव्हती. किडनी डोनर मिळण्यासाठी ताई देवाचा धावा करत होती.तिच्या सौभाग्याशीवाय तिच्या आयुष्याला काही अर्थ नव्हता. तिच्या नवऱ्याने तिच्यावरच्या हक्काच्या प्रेमात तिच्या भावाचा भाग मनापासून स्वीकारला होता.भावासाठी काढलेले कर्ज , केलेले कष्ट कशात कशात त्याने आडकाठी केली नव्हती. त्याच्या अबोल पाठिंब्यानेच तिने भावाची जबाबदारी निभावली होती.आता नवर्याशिवाय जगणे तिला असंभव वाटत होते.इकडे दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत होती आणि ताई ची कृश मूर्ती अजूनच कृश होत होती.
एक दिवस तिला डॉक्टरांनी आनंदाने सांगितले की डोनर मिळालाय. ताबडतोब ऑपरेशन करायला हवे . डॉक्टरांची गडबड सुरू झाली. ताईला आशेचा किरण दिसू लागला.हा डोनर देवाच्या रूपाने आला असेच तिला वाटले. आपल्या कातड्याचे जोडे करून दिले तरी उपकार फाटणार नाहीत असे तिच्या मनात आले.ऑपरेशन चालू असताना ताई देवाजवळ बसून जप करत होती. किती वेळ गेला कोणास ठाऊक पण पहाटे नर्स सांगायला आली की ऑपरेशन यशस्वी झाले आहे पण अजून दोन तीन दिवस धोका आहे.खूप काळजी घ्यायला हवी.आता हवी ती लढाई लढायला ताई सज्ज होती.नवऱ्याला पाहायला,त्याचा हात हातात घ्यायला ती अधिर झाली होती.

एक क्षण आला की डॉक्टरांनी तिला आत बोलावले.तीच्या नवऱ्याजवळ नेले .त्याचा हात हातात घेऊन ती रडू लागली. दोघांनी देवाचे आभार मानले पण डॉक्टर म्हणाले देवाच्या आधी डोनर चे आभार माना. परदेशातून इतक्या लांब येऊन एका Nri ने आपली किडनी यांना डोनेट केली आहे.
एक क्षण ताईने त्यांच्या कडे पाहिले आणि तिरासारखी धावत त्या डोनरच्या खोलीत शिरली.आत जाताच थबकली. त्या खोलीत ताईचा लाडका भाऊ आपली 'अनोखी भाऊबीज ' ताईच्या ओटीत घालून शांत पणे झोपला होता.

गुबूगुबू नंदीवाला पाली वर राहण

*मुलांच्या शिक्षणामुळे साजरी  होतेय नंदीबैलवाल्यांची आनंदी दिवाळी !*    (प्रशांत वाघमारे .)
पालावरच जीन आता संपून जाय रं,
शिक्षणाच्या दिव्यामुळे आमी बी पुढं जाय रं !
वर्षेभर  नंदीबैलासह गावोगावी भटकणार्या नंदीबैलवाल्यांची दिवाळी त्यांच्या पालावरच मोठ्या उत्साने साजरी होत आहे. कारण त्याच्या पासून लांब असणारी त्यांची मुल आज त्यांच्या सोबत होती.
धोतर,नेहरु शर्ट त्यावर कोट व डोकीला लाल फेटा बांधलेल्या नंदीबैलवाल्या सोबत जीन, टि शर्ट , पंजाबी ड्रेस घातलेली त्यांची मुल-मुली मोठ्या आनंदाने पाहून , शहरी वातावरणात जनरेशन गँपमुळे संवाद दुरावलेल्या दोन पिढ्यांची किव आली.
बीड जिल्ह्यातील कडा-आष्टी गावच्या नंदीबैलवाल्यांची पाल वाखरी परिसरात विसावली होती. लहान मुलांची दिवाळी साजरी करण्याच्या उत्साहाबरोबरच मोठ्या माणसांच्या नंदीबैलासह दिवाळी मागण्यास जाण्याची गडबड चालू होती.
कुतूहलापोटी त्यांच्या पालावर जाण झाल अनं पारंपारिकते बरोबरच शिक्षणामुळे जाणवणार आधुनिकपण नजरेस पडल. सखाराम पवार(बाबा)यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मंडळी गावोगावी भटकत असतात. गुजराती जातीची नंदीबैलाची खोंड विकत घेतात.पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ करुन ,त्यांना प्रशिक्षित करतात. नंदीबैलाचा खेळ करुन लोकांकडून धान्य,थोडेफार पैसे मिळतात. त्यावरच सार्या संसारीची गुजरान त्यांना करावी लागते. नंदीबैलास एका गावावरुन दुसर्या गावी नेण्यासाठी वाहनांचाही वापर करावा लागतो. पूर्वी सारखे लोक दान देत नाहीत. गावाकडे आसलेल्या मुलांना पैसे पाठवावे लागतात, फार ओढाताण होत आसल्याचे खिन्न मनाने महिला सांगत होत्या. परंपरागत आलेला हा व्यवसाय ,अखेरपर्यंत चालू ठेवणार आसल्याचे सर्व वडीलधारी मंडळी सांगत होती.
त्याच वेळेस शाळेला सुट्टी असल्याने पालावर आई-वडीलांकडे आलेली मुले मात्र खूप शिकणार असल्याची सांगत होती. त्यातील बहुतेक मुले गावाकडेच राहतात.काही बरोबर आजी असेल तर ठिक नाहीतर बहिणभाऊ घरीच राहून, स्वतःच स्वयंपाक करुन जिद्दीने शिक्षण पूर्ण करीत आहेत.हाँस्टेलला व्यवस्था बरोबर नसल्याचे ते सांगतात.
सचिन ढवळे व त्याची बहिण प्रियांका दोघेच घरी राहून शिक्षण पूर्ण करीत आहेत. सचिन बारावीत असून प्रियांका नववीत आहे. सचिन पाडव्यालाच परत जाणार आहे कारण तो असोशिएशन कडून कबड्डीच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आई-वडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असून , खूप शिक्षण घेऊन त्यांना सुखी
 करण्याचा मनोदय ती दोघा बोलून दाखावित होती. तर जवळच असणारी त्यांची आई डोळ्यात आनंदाश्रू घेऊन कौतुकाने मुलांकडे पाहत होती.
  कितीही कष्ट पडत असले तरी तरी , सर्व मुलांना शाळेत घातले असल्याचे अभिमानाने सांगणारे नंदीबैलवाले पाहून आता पालावरही ज्ञानाची दिवाळी मोठ्या धुमधडाक्याने साजरी होत असल्याचे जाणवले !
फटकण फुटणार्या फटाक्यांवर लाखो रुपये खर्च करणार्यांनी आजूबाजूच्या उपेक्षितांसाठी मदतीचा हात पुढे करुन सहकार्याची, मदतीची खरी दिवाळी साजरी केल्यास या सणांचा आनंद द्विगुणीत होईलच ,पण त्या बरोबरच पैशात मोजता न येणार आत्मिक सुखही मिळेल ! मग चला करुयात आपल्याही  दिवाळीत असेच कुणाला तरी सामिल !!

Tuesday, 10 October 2017

असंख्य मनातील काहूर



                लहानपणापासून बालमनाला विविध प्रश्न पडतात,सूर्य,चंद्र,ग्रह,तारे,अंतराळ इतपर्यंत ठीक होत.पण हे चंद्रग्रहण,सूर्यग्रहण हजारदा वाचून पण ते सावलीचे खेळ त्या वयात न समजणारेSp355847@gmail.com देखील आज आहेतच की जिवंत.गावाला जाताना वाटायचं ह्या दूर डोंगरावर विजेचे मोठयाले खांब नेमके कुणी बसवले असतील?,चंद्र आपल्या गाडीसोबत कसा धावतो?,कोंबडी आधी की अंड?,बाईच्या पोटात नेमकं बाळ येत कुठून?ते बाहेर कस पडत असेल?शिवू नको म्हणजे काय?आमच्यात हे चालत,तुमच्यात नाही☺हे आमचे तुमचे कोण?लोक नाव ठेवतील ,ही नाव ठेवणारी लोक नेमकी कोण?,बाईला वय विचारू नये,पुरुषाला पगार हा महान शोध लावणारा कोण?वयाने मोठी व्यक्ती सांगतात ,"खोट बोलू नये.पण वय वाढत तस कळत हीच लोक जास्त खोट बोलत आहेत.व्यभिचार करू नये ,पण नेमकं काय म्हणजे व्यभिचार?सगळ्या धर्माची शिकवण मानवतेची तरीही मानवी नैतिकता शिकण्यासाठी धर्मच का हवाय?एक ना अनेक प्रश्न सतत मन विचारत राहत.हे मन नेमकं काय?ते राहत कुठे?दिसत का नाही?,वैरी न चिंती, ते मन चिंती?म्हणजे नेमकं येणारे नकारात्मक विचार का?कुठून ह्या डोक्यात घोळत असावेत.
                       मुंबईसारख्या ट्रेनच्या वेगाने धावणाऱ्या लोकांकडे पाहून खरंच नवल वाटत.वयवर्षे साठ नोकरी केल्यावर,निवृत्तिनंतर देखील त्याच वेळेला घरातून निघून फलाटावर गाड्याची ये जा पाहणारे असंख्य सुरकूतलेल्या नजरा असो की नुकतच तारुण्यात प्रवेश केलेली युवक युवती असो.सतत शून्य नजरेने पुलावर उभे राहून नेमके काय शोधत असावेत?,एखादे लहान मूल घरीदारी एकटाच भिंतीशी,बाहुलीशी बोलताना दिसत.वयस्कर मंडळी टीव्हीसमोर बसून गेलेले दिवस आठवू पाहतोय.तर पंचेचाळीशी गाठलेले तारुण्य निसटून गेलं म्हणून हळहळताना दिसतोय.रेल्वेची घोषणा सुरू असते,रेल्वेतून उतरताना,गाडी व फलाटाच्या अंतराकडे लक्ष द्या.तरीही अपघात होतोय,माणसे विचारात चालत्या ट्रेनमध्ये चढतोय ,उतरतोय.नेमकी ही उलटी क्रिया करताना कोणते विचार मनात गोळत असावेत?मोबाईल मध्ये विविध गेम खेळत खर तर आपला अमूल्य वेळ वाया जातोय समजताना त्यातून हरणे,जिंकणे नेमके कुणाशी सुरू असते.
                    पूर्वी मामाचे पत्र हरवले,ते मला सापडले.हल्ली मन मोकळं करायला हा मामा,काका, आत्या होते आता जागेअभावी विभक्त झालेत. व माणूस एकाकी पडत चाललंय.आपला आनंद फक्त नवरा बायको,हम दो, हमारे दो, पुरता सीमित झालाय.आठवड्यातून एकदा सिनेमा,पिटझा पार्टी,एक दूर पिकनिक,मॉल मध्ये खरेदी म्हणजे जगतोय का?ह्याचा खरच विचार करण्याची वेळ आलीय.तो क्रोकोडाइल हंटर आपण डिस्कवरी वाहिनीवर पाह्यचो.त्याचा अंत देखील त्या शोधपायीच झाला.भुंगा कमळात मध शोधत त्यात त्याचा मोहापायी अंत होतो,पतंग दिव्याच्या प्रकाशाला भाळतो,अंत त्याच दिव्याच्या वातीत होतो.मानव निश्चित ह्यापेक्षा वेगळा आहे.जे क्षण गेलेत ते पुन्हा येणे नाही,भविष्याचा अति विचार करून उपयोग नाही.माणसाच्या क्षणाचा भरवसा देणं कठीण होत असताना.मोकळेपणाने ,आपलेपणाने एकमेकांशी घरीदारी मुक्त संवाद होणे,शारीरिक ,मानसिक गरजा स्वतः स्वतःच्या शोधून स्वमर्यादा एकदा उमजल्या की नक्की आपल्या नजराही शून्यात न लागता अधिक बोलक्या होतील.
मनातील भाव प्रकट केल्या न मन अगदी प्रसन्न होत तुम्हाला नक्कीच आवडेल  एकदा आपल्या ही भावना मनमोकळेपणाने सांगा असे वाटते
sp355847@gmail.com

विवाह एक भीषण परिस्थिती...

    पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशव...