Wednesday 20 May 2020








     

   

                  *पाठदुखी वर उपाय आणि आहार*

 *१) नीट झोपा* – पाठदुखी असलेल्या माणसांना नीट झोप लागत नाही. जेव्हा झोप अपुरी पडते तेव्हा पूर्ण दिवस तर बेकार जातोच पण पाठदुखी सुद्धा वाढते. अशा वेळेला झोपण्याच्या पद्धतीवर लक्ष देणे आवश्यक आहे. पाठदुखीचा त्रास असेल तर पाठीवर झोपणं शक्यतो टाळाच. एका बाजूला कडेने झोपा आणि दोन्ही पायांच्या मधे उशी ठेवा. झोपताना एका सरळ समान गादीवर झोपा.

 *२) शरीराची ठेवण सुधारा* – ह्याचा अर्थ असा कि मान ताठ ठेवा आणि शरीर बांधणीच्या अनुकूल कार्य करा. बसताना योग्य स्थितीत बसा, वाकताना कंबरेतून हळू वाका आणि चालताना पाठ आणि छाती ताठ ठेऊन चाला. लॅपटॉप वर काम करताना मान सरळ ठेवा आणि खांदे रिलॅक्स ठेवा. ह्या लहान लहान गोष्टींवर लक्ष दिल्यास पाठदुखीच्या अनेक मोठ्या समस्यांना दूर ठेवता येते.

 *३) शारीरिक चिकित्सा –* पाठदुखीसाठी शारीरिक चिकित्सा करून घ्या. त्यासाठी तुम्ही आपल्या नेहमीच्या डॉक्टर कडे जाऊ शकता. तिथला चिकित्सक तुमच्या शरीराचे परीक्षण करून पाठदुखीचे मूळ शोधून काढेल आणि त्याप्रमाणे योग्य तो व्यायाम आणि आहार तुम्हाला सुचवेल. ते करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आम्ही काही व्यायाम आणि आहार ह्या लेखात सांगणार आहोत. ते ट्राय करून बघायला ही काही हरकत नाही.
 *४) अति आराम करू नका* – पाठदुखी असलेल्या लोकांना डॉक्टर्स आराम करायला सांगतात. पण अति आराम झाल्यास पाठदुखी अजून बळावू शकते. २ दिवसापेक्षा जास्त बेड रेस्ट घेऊ नका. उठा आणि चालायला जा. थोड्या वेळ जॉगिंग करा आणि योगा करा. व्यायाम केल्याने पाठदुखी नेहमीपेक्षा लवकर बरी होते हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.

 *५) बर्फ आणि गरम शेक –* पाठदुखी होत असलेल्या जागेत काही दिवस बर्फाचा शेक द्या. एका कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून पाठीला लावा. काही दिवसांनी रबरी पिशवीत गरम पाणी घेऊन त्याच ठिकाणी शेक द्या. त्यामुळे तिथल्या मांसपेशी रिलॅक्स होतील आणि रक्तप्रवाह सुरळीत होईल. त्या नंतर सर्वात चांगला उपाय म्हणजे मस्त गरम पाण्याने अंघोळ करा. शॉवर असेल तर उत्तम पण भांड्याने अंघोळ करत असल्यास पाठीवर वेदना होत असलेल्या ठिकाणी हळू हळू गरम पाणी सोडा. रोज हा उपाय केल्यास पाठदुखी जास्त दिवस टिकणार नाही.

 *६) मसाज* – ह्या साठी तुम्हाला मसाज पार्लर मध्ये जायची गरज नाहीये. आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला तुम्ही मसाज द्यायला सांगू शकता. पण त्यासाठी तुम्ही त्याला योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे नाहीतर तो कुठली तरी नस दाबून मोकळा व्हायचा आणि डबल काम व्हायचं. त्यामुळे त्याला तुमच्या वेदनांबद्दल पूर्ण माहिती द्या आणि तेलाने मालिश करा. मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि अंतर्गत आणि बाह्य हालचाल सुधारण्यास मदत मिळते.

 *७) स्मोकिंग करता* ? – स्मोकिंग करत असाल तर सोडून द्या. तुम्ही म्हणाल ह्याचा स्मोकिंग शी काय संबंध? अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन मधे छापलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे कि स्मोकिंग फक्त तुमचे लंग्सचं नाही तर पाठदुखी ला ही कारण ठरू शकते. तंबाखू मध्ये असलेल्या निकोटीन मुळे लहान रक्तपेशी पाठीतल्या सॉफ्ट टिश्यू पर्यंत पोहोचू देत नाहीत त्यामुळे तिथे रक्त पोचत नाही.

 *८) पोटाचे व्यायाम करा* – पोटाचे व्यायाम म्हणजे तुम्हाला ६ पॅक्स बनवण्याची गरज नाही. बनवायचे असतील तर बनवू शकता. सांगायचा मुद्दा हा कि पोटाचे पण मसल्स असतात. त्यांना थोडं ट्रेन करा. पोटात पण ताकत येऊ द्या. पोटाला अवाढव्य बनवू नका. आपल्या कंबरेवरील शरीराचा लोड आपली पाठ घेत असते. थोडं प्रेशर घेण्यालायक आपल्या पोटालाही बनवा. पोटाला अजिबात वाईट वाटणार नाही उलट थँक यू म्हणेल. त्यामुळे पाठीवरचं प्रेशर ही निघून जाईल आणि लवकर बरी सुद्धा होईल.

    *****व्यायाम कोणता कराल?
पाठदुखी असलेल्या लोकांना व्यायामाची गरज असते. पण सर्वच व्यायाम प्रकार त्यांच्यासाठी उपयुक्त नसतात. त्यांनी स्ट्रेचिंग चे व्यायामप्रकार सुचवले जातात ज्यामध्ये पोटाचे आणि पाठीचे मसल्स स्ट्रेच होतात.


 *१) अर्धे क्रन्चेस* – हा पोटासाठी केला जाणारा व्यायामप्रकार आहे ज्यामध्ये पोट आणि पाठ स्ट्रेच होते. जमिनीवर पाय गुढघ्यातून वाकवून झोपा आणि दोन्ही हात छातीवर क्रॉस ठेऊन ३० डिग्री वरती उठण्याचा प्रयत्न करा आणि परत खाली जा. हे करताना कंबरेवर ताण आला नाही पाहिजे. ८-१० वेळा असे रोज करा.

 *२) वॉल सीट्स* – भीतीला टेकून बसण्याचा हा व्यायामप्रकार आहे. १०-१२ इंच भीतीच्या समोर पाठ करून उभे रहा आणि भीतीला टेका. हळूहळू खाली सरका आणि बसण्याच्या पोझिशन मध्ये या. तुम्हाला कोणत्याही टेबल वर इथे बसायचे नाही हे लक्षात घ्या. १० मोजा आणि पुन्हा ह्या १० वेळा हा प्रकार करा. हे दोन व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता. पण कोणताही व्यायाम प्रकार करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 *** आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?*
          आहारात ऑलिव्ह ऑइल चा वापर करा तसेच दूध, तूप दह्या सारखे पदार्थ शरीरातलं कॅल्शिअम वाढवण्यात मदत करतात. तसेच आलं ही पाठदुखीमध्ये खूप गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच मासे, हळद, कॉफी, ड्राय फ्रुट्स, द्राक्षे ह्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी पदार्थ असतात जे वेदनाशामक म्हणून काम करतात. तुम्हालाही पाठदुखी असेल तर वरील दिलेले उपाय ट्राय करून बघा आणि गरजूंना शेयर करा.

माहिती संकलनश्री
, सारंग दशरथ पाटील


Saturday 8 December 2018

शाळेत उठसूठ पालकांची लुडबुड



             lll  विधायक शिस्त  lll



उषा विलास जोशी यांचा
 शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख*.
**फक्त शिक्षकांनाच दोष देऊ नका*
विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा.        ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*
५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले,मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती*. त्या काळात शिक्षक ही तसेच होते . अशा *शिक्षकांमुळे आपण सारे घडलो* आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच म्हणजे स्वतःला सोडवायच्या असतात. आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. .चुकीचे गैरवर्तन करू नका. हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली.

आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात आणि ही चर्चा चालते त्या मुलांदेखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडवतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) आई-वडील आपल्या वर्तणुकीला    सपोर्ट करता बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात. हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते मात्र  आंधळया प्रेमापोटी ते समजण्याच्या मनस्थितीत नसतात.

50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. .
या कडक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम अतिसंवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला.
1990 नंतरच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे शिक्षक होते त्यांच्याकडून अति कडक शिस्त आणि शिक्षा यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात सुरू झाले.
याच दरम्यान ग्लोबलायझेशन नुकतेच आले होते. पालकांची मानसिकता बदलत होती.. भौतिकवादाकडे आपण चालायला सुरुवात झाली आणि अतिमहत्त्वकांक्षा, हव्यास अशी चुकीची मूल्ये  समाजात रुजायला लागली.
*पास-नापास यांचा गंभीर प्रश्न समाजासमोर यायला लागला.* नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले. "शालेय परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास", या एका विचारामुळे विद्यार्थ्यांंमध्ये नैराश्य वाढत गेले.
याच दरम्यान शिक्षणाचा कायदा आला. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा करणे हा गुन्हा ठरवला. आठवीपर्यंत नापास करता येणार नाही अशा तरतुदी आल्या यामुळे कडक शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल झाला. बरेच शिक्षक रिटायरमेंट स्टेजलाच होते. 2001 नंतर शिक्षकांची नवी तरुण पिढी यायला लागली. पण या दरम्यान पालकांच्या मानसिकतेमध्ये फार बदल झाला होता. येत्या दहा वर्षांमध्ये भौतिकवाद  समाजात प्रचंड  रुजला. *जिंकणे हेच सर्वस्व मग भले ते कुठल्याही मार्गाने मिळो हा संस्कार पालकांमध्ये घट्ट रुजला* आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला. पालकांमध्ये आपल्या मुलाबद्दल अति महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या. एकुलते एक बाळ. . त्याला हव्या त्या गोष्टी पुरवणे. . त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे.. हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले. याच दरम्यान पालक आणि विद्यार्थी सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही या सर्व गोष्टीत अडकले. मैदानी खेळ नाही, अति स्क्रीन टाइम यातून मुलं हट्टी बनत गेली. *मागितले तर मिळते हा संस्कार अधिक रुजला.* चंगळवादामुळे पालकांमध्ये मूल्य-संस्कार याचे महत्व कमी झाले. *याचा महत्त्वाचा परिणाम शिक्षकांबद्दलचा सन्मान कमी झाला. *प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाते अशा खोट्या समजुतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान व्हायला सुरुवात झाली.* अति लाडा मुळे म्हणा किंवा अतिमहत्त्वाकांक्षी पणामुळे म्हणा किंवा शिक्षण कायद्याचा गैरवापर म्हणा पालक छोट्या-छोट्या कारणांसाठी शिक्षकांशी वाद घालू लागले.

आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १०० मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत सर्व ती करू लागली. *पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा रंगू लागल्या.* येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब  होऊ लागला. *त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.*

शिक्षण कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसले. शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.

म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची. *विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही.* शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या  प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात. मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण  करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो. *विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही.* असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही  शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात . *ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थीu कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. *या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते.* मारणं हे अयोग्यच  त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे.

काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो. स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.

जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे. . जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो आणि त्याचे शैक्षणिक समस्याचे प्रमाण वाढत जाते.

काही पालक खास करून आया आपल्या बद्दल नेहमी असमाधानी असतात. पालकत्वाची A B C D सुद्धा माहित नसलेल्या या आया शिक्षकांसमोर माझं मूल कसं मूर्ख आहे, त्याला कसं कळत नाही आणि या सर्वाला एकमेव टिचरस कसे जबाबदार आहे हे मोठ मोठ्या आवाजात दहा पालकांसमोर बडबडत असतात. *अशा पालकांच्या पाल्याचे भविष्याबद्दल खरच चिंता वाटते कारण असे पालक समजून घेण्याच्या पलीकडचे असतात.* काही पालक तर मुख्याध्यापकांकडे हट्ट धरतात की शिक्षकांना बोलवा आणि माफी मागायला लावा. यातून टीचेर्सचे मनोधैर्य कमी होते. ते शाळेतील एक्स्ट्रा कामे करायला कंटाळा करतात. शिक्षकांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळूहळू कमी होते.

*या काही कुरकुरे पालकांमुळे शिक्षकांचा उत्साह कमी होतो.* प्रत्येक शाळेत असे कुरकुरे पालक असतात त्याचे प्रमाण दहा टक्के पण नसते पण त्यांच्या चुकीच्या संवादामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे, चुकीच्या अपेक्षेमुळे शाळा व्यवस्थापनाशी वाद होतात. 90% पालक हे शाळेबद्दल नेहमी आनंदी असतात पण ते बघ्याची भूमिका घेतात. शिक्षकांना कौतुक करण्यात ते कंजुषी करतात आणि मग हे 10% पालक अतिशय उद्धटपणे विषय हाताळतात. सोशल मीडिया, वृत्तपत्र यांना चुकीच्या माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करतात. व्यक्ती/संस्था जेवढी मोठी तेवढ्या तिखट-मीठ लावून बातम्या रंगवल्या जातात.. या सर्वांची सुरुवात झालेली असते ती म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षा अति अपेक्षा चुकीच्या पालकत्वाच्या या बीजातून.

कालच बातमी वाचली नाशिकमध्ये एक पाचवीचा विद्यार्थी दोन दिवस शाळेत आला नाही म्हणून शिक्षकाने आईला फोन करून सांगितले. आई म्हणे तो रोज शाळेत जातोय. आईने मुलाला विचारले, तेव्हा तो कबूल झाला मी शाळेत जातो सांगून घरातून निघतो पण शाळेत जातचं नाही. तो वाईट मुलांच्या संगतीत लागला होता. म्हणून आईने त्याला दोन फटके दिले. आईने मारले याचा राग आला म्हणून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आता या घटनेला कोण जबाबदार? शिक्षक.. ज्याने काळजीपोटी मुलगा शाळेत येत नाही म्हणून फोन केला का आईने त्याला पहिल्यांदाच मारले का तो स्वतः विद्यार्थी ज्याला राग सहन होत नव्हता. आईने आधीपासूनच शिस्तीला महत्त्व दिले असते, चुकले की रागवले असते, शाळेचे नियम हे भविष्य चांगले करण्यासाठीच असतात हे जर पहिलीपासून मनावर बिंबवले असते तर आज ही वेळ कदाचित आली नसती.

*पालकांनो शिस्त ही प्रेमाची पहिली पायरी  आहे.* शिक्षकांना त्यांची कामे करू द्या. *शाळेचे छोटे छोटे नियम पाळावेच लागतात कारण त्यातून मोठेपणी भारतातील कायदे पाळण्याचे संस्कार रुजत असतात.* शाळेत थोड्या उशिरा पोहोचल्याने त्यांच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व कमी होते याचे साधे ज्ञानसुद्धा आजकाल पालकांना नसते. आजकालची मुलं अति लाडा पोटी बिघडत चालली आहे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही. त्यांची वाढ अशीच झाली तर पुढे ते आई-वडिलांची झोप उडवू शकतात म्हणून शाळा शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या ओपन हाऊस, पालकांच्या मिटींगला शिक्षकांशी सन्मानांनी बोलणे, त्यांना समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना आदर आणि सन्मान जर राहिला तर त्या विद्यार्थ्यांना योग्य रुळावर आणणे सोपे जाईल.

जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते आणि देशाचे नुकसान होते.
🙏🏻 उषा विलास जोशी
 
संकलन- श्री सारंग दशरथ  पाटील 
अविरत विज्ञ-सहशिक्षक
सोलापूर 

Thursday 18 October 2018

धक्का

                          ' धक्का '       




              धक्का हा शब्द ऐकून.क्षणभर धक्का बसल्यासारखे वाटतं किंवा दे धक्का चित्रपट आटवला असेल किंवा आपल्याला बसलेला लहानमोठा धक्का आठवला असेल नाहीतर धक्का न लागता काहिही वाटलं नसेल ,अशी आपली अवस्था झाली असेल.पण प्रत्येकाने कुठे ना कुठे धक्का खाल्लेला असेलंच.तसंतर आज अवघं जीवनंच धकाधकीचे झाले आहे .त्यामुळे धक्काच बसत नाही असं काही नाही पण जाणवण्याची संवेदना हरवून बसलो आहोत आपण.

             पुर्वी लोक सावकाश, शांत,स्वस्थ,संयमी ,नियम व नियंत्रित जगायची.आजच्याइतकी धावपळ नसायची जगण्यात .त्यामुळे आवर्जुन धक्का देणारे धक्याला बुक्की असे खेळ खेळले जायचे,फार फार तर बंद पडलेले ट्रक, ट्रँक्टर,बस जीप इ.वाहनाना धक्का देताना आम्ही पाहायचो.हां काहीजण ही वेळ येऊ नये म्हणून वाहन बंद करतानाच उताराला उभी करण्याची हुशारी करुन उताराचा धक्का घ्यायची.फँनमध्ये कधी काही बिघाड झाला कि थोडा धक्का काटीच्या सहाय्याने दिला जाई.मग तो फिरायचा,तसा गावचा बाजारहाट,यात्रा,जत्रा सण उत्सवात धक्काबुक्की व्हायची पण वाद व्हायचे नाहीत सहनशीलता बरी होती आज प्रचंड धक्के खात देत आपण जगतो,घराच्या बाहेर पडलो की,धक्का खायची तयारी ठेऊनंच पडावं लागतं,पुणे मुंबई रेल्वे स्टेशन तर आपणास गर्दीच धक्के देत पुढे सारले जातो असंच वाटतं आणि आपल्या सारख्याला गड्या आपला गावंच बरा वाटायला लागतो.हाही एक धक्काच असतो. कारण गावात असताना मुंबई दुरुन फार सुंदर दिसते ना.

                   आपलं जीवनही सुखदुःखाच्या.धक्यानेच पुढे पुढे जात असते,कधी सुखद,तर.कधी दुःखद, कधी वाहणाच्या धक्यानी आयुष्यातून उठतो तर कधीवेळेवर मिळाल्यानेच जीवन दान मिळते.नोकरी,व्यवसायात अदेक चांगलेवाईट धक्के बसत राहतात.कधी आपलीच माणसं धक्कादायक वागताना दिसतात तर कधी परकी माणसं आपणांस सुखद धक्का देतात.आजचं युग हे धक्याधक्याचं आहे.धक्का म्हणजे मालसामान उतरा यची बंदराची जागा,धक्का म्हणजे नवल वा आश्चर्य,धक्के खाणे म्हणजे अनुभव घेणे,धक्याला लागणे म्हणजे इच्छित स्थळी पोहोचणे.धक्का म्हणजे शॉक ,धक्का म्हणजे अपेक्षित वा अनपेक्षित घटना अकस्मित घडणे होय.असा हा छोटा वाटणारा शब्द कधी दुःखाचा डोंगर आपल्यावर टाकतो,कधी न पचणारी संकंटं देतो तर कधी सुखावून टाकतो.असं म्हणतात तेच खरं.

                  सुखी स्वस्त मस्त रहायचं,जगायचं असेल तर धक्याला बुक्की चा खेळ न करता बुद्धीचा वापर करून शांत रहा,सुखी रहायचं असेल तर हमरीतुमरीवर न येता पचवाव्या लागतील काही गोष्टी मग असे धक्के फार नाहीत जाणवणार,हाच आहे आपला आजचा धडा वाचा व विचार करा नाहीतर जराजराशा धक्यानी व्यतीत व्हायची वेळ येणार नाही. कारण कोणताही प्रश्न वा परि स्थिती युद्धापेक्षा बुद्ध,कबीर,महावीरांच्या शांतीची गरज आहे.धक्का द्यायला ताकत लागत नाही पचवायला ताकत लागते ती कमवावी लागेल ,हे वाचून कदाचित धक्का बसेल पण सुखी जीवनाचा हा राजमार्ग आहे.करु प्रयत्न जमेल सारं नाहीतर धकाधकीचे जीवनही अधिकच धक्के खात जगावं लागेल ,विचार करा,पदव्या घेताना मिळालेलं ज्ञान व्यहारात आणू या.त्यासाठी एक धक्का स्तःला जरुर द्या व आपली जीवन नौका धक्याला लावा.वाचा विचार चिंतन करा.लागा कामाला....

रेशीम गाठी

*रेशीमगाठी......*

तिन्ही सांजेने रंग उधळला...
त्या क्षितीजाच्या काठी.
सुगंध होऊन पवन दरवळे...
झाली सुगंधित माती.

लाल राक्तिमा गाली येऊन..
शृंगार सखीचा सजला.
तिचा प्रियकर कृष्ण होऊनी...
यमुने काठी दिसला.

अवखळ झाल्या रेशीमगाठी..
बंध विरहाचे तुटले.
ते दोघे मग प्रियकर होऊन.
एकमेकांना झटले.

तुला स्पर्शिता कमल हातांनी..
वेग वाऱ्यावर स्वार व्हावा.
सांग सखे या यौवणाचा..
का तुलाच भार व्हावा.

श्वास फुलवता पेट पेटला..
त्या मन द्वाराचा अग्नी.
रंग उधळले लाजेने हा...
कसा पेटला कामाग्नी.

त्या आभाळा अंत नसावा.
तशी असावी प्रीती...
समय सरावा मंदगतीने..
नसे कोणाचीच भीती.

तृप्त तृप्तीचा भास सखे हा...
प्रेम पुरावा होतो.
शिडकाव स्वरांचा तनुवर होता...
मी तुझाच होऊन जातो.

शिडकाव स्वरांचा तनुवर होता...
मी तुझाच होऊन जातो.










Sunday 14 October 2018

अंत्ययाञा

*" एका कवीची अंत्ययात्रा "....*

हो खरी आहे ती गोष्ट.रात्री अपरात्री तो दचकून  ओरडत उठायचा म्हणे अंथरुणावर.
तेंव्हा सारं घर जागं व्हायचं म्हणे त्याचं.
जेंव्हा त्याची आई त्याला जवळ घेऊन थोपटायची तेंव्हा.
सगळाच्या सगळा तो आईच्या पदरात रिता व्हायचा.
मग पाठीवरून  फिरणाऱ्या आईच्या हातांनी त्याला धीर यायचा.
*सालं रडलं नाही लढलं पाहिजे.*
बाबा सांगायचे त्याला.
*तू स्वतःच्या भावनांशी युद्ध कर पोरा.* तेंव्हाच तुला बरं वाटेल.
बाप चुलीतली राख त्याच्या डोक्याला फासत म्हणायचा.
त्याच्या राखेत शेकडो देव देवतांचा आशीर्वाद होता म्हणे.
मग जास्तच त्रास व्हायला लागला...
कि तो जवळ वही ओढायचा.
पेनाने भरभर लिहून काढायचा काही बाही.
तेंव्हा मात्र तो मोकळा व्हायचा.रिता व्हायचा.
निर्मळ व्हायचा.गंगेच्या पवित्र पाण्यासारखा.
हल्ली त्याला वेडाचे झटके हि येऊ लागलेत.
आई काळजी करत बसायची.
देव पाण्यात ठेवायची.आणि बाप डॉक्टर शोधत असायचा.
खरंतर त्याचा विकार मानसिक होता.
त्या वेदनांशी झगडतांना तो थकला कि लोकांना फिजिकली वाटायचं...
की तो नक्कीच वेडा झालाय.
पण तसं नव्हतं काही.
खूप वर्षापूर्वी त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं.
पण ते सक्सेस मात्र झालं नाही.
ती अर्ध्यात डाव सोडून गेली.
तेव्हापासून त्याला असं होतं.
डॉक्टर हल्ली त्याला झोपेची इंजेक्शन देतात.
गोळ्या देतात.
पण ते जाणिवांचा औषध देत असतील.
पण नेणिवेचं काय?
त्याला आहे का काही औषध?
आठवणी....
काही केल्या तरी जात नाहीत मनातून.
तेंव्हा खरा दुःखी होतो माणूस.
काळाचा मलम प्रेम केलेल्या व्यक्तीवरच्या जखमेची भरती नाही करू शकत.
ना कि वेदनेची.
या वेदनेला औषध नाहीच.
म्हणून लोकं एकटी राहत असतात प्रेमात पडल्यावर.
त्यानेही असंच केलं होतं काहीसं वेडं प्रेम.
तेंव्हा तिच्यासाठी समाजाबरोबर दोन हात करायची हिम्मत त्याच्यात नक्कीच वाढली होती.
सगळ्या जगाशी लढण्याची भाषा करणारा तो..
हल्ली गप्प गप्प असतो.
ती गेली...
सारं संपलं. असाच बडबडत असतो तो हल्ली.
परवा त्याच्या कवितांना खूप मोठा पुरस्कार मिळाला.
पण तो गेला नाही कार्यक्रमाला.ना त्याने गाव सोडलं.
तो फक्त इतकंच म्हणत राहिला.
*प्रेम होणं या पेक्षा जगात कुठलाच पुरस्कार मोठा नाही.*
कधी कधी असं बोलून तो ऋषितुल्य वाटायचा मला.
प्रेमात पडल्यावर अर्ध्यात डाव मोडलेल्या कित्येक  व्यक्ती मी जेंव्हा बघतो.
तेंव्हा ते अतृप्त मृतात्म्या सारखे वाटतात मला.
जगात प्रेम आहे रे...
पण ते मिळवायची धमक पाहिजे.
किती सुंदर वाक्य सांगून गेला होता तो दुनियादारी मधला ऍक्टर.
पण कुणाला आजवर खरं प्रेम मिळालंय.?
अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं यशस्वी झाली.
पण बाकीच्यांचं काय?
त्यांनी कुठे मांडावी आपली वेदना...आपलं दुःख.?
सगळं जग प्रेमरोगी झालंय.
तरीही या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
काल तो अचानक गेला.याची जेंव्हा मला खबर मिळाली तेंव्हा...
जेवता जेवता माझा हात आपसूक थांबला.
तसाच हात धुऊन मी त्याच्या घराकडे धावलो.
खूप मोठी गर्दी झालेली.
*त्या गर्दीत त्याच्यासाठी आलेले दर्दी किती होते?*
सांगणं मुश्किल होतं.
त्याची आई...त्याचे बाबा ..त्याच्यासाठी रडत होते.
तेंव्हा मला आतून गलबलून आलं.
*कवीने असं प्रेमात कधीच मरु नये.* त्याला सरणावर घालतांना थरथरलेला त्याच्या बापाचा हात...
माझ्या नजरेतून सुटला नाही.
तो मात्र इथून सुटला.मोकळा झाला मोह मायेतून.
चांगलं झालं त्याचं.
त्याच्या  चितेने पेट घेतल्यावर लोकं माघारी वळली.
*एका कवीच्या अंत्ययात्रेला आली होती ती.*
लोकं फक्त स्मशानापर्यंतच.एव्हढं मात्र नक्की कळलं मला.
आता स्वर्ग वगैरे असला तर त्याची प्रियेसी त्याला मिळेल का?
हा पोरकट प्रश्नही येऊन गेला माझ्या मनात.
मिळेल मिळेल...नक्की मिळायला हवी.
मी आभाळाकडे हात केले.
प्रार्थना केली त्या देवाला.
एका कवीला स्वर्गात सुखरूप घेऊन जा रे बाबा....
आणि.....
काहीतरी अचानक आठवलं म्हणून मी खिशात हात घातला.
त्याच्याच कवितांची चिट्ठी होती ती.
उघडली मी...
वाचून काढली शेवटची..
तेंव्हा सुरेश भट्टांचे काही शब्द आठवले मला...

*इतकेच मला जातांना...*
*सरणावर  कळले होते.*
*मरणाने केली सुटका...*
*जगण्याने छळले होते.*

मी डोळे पुसले.कागद व्यवस्थित घडी केला.
एकवार जळणाऱ्या चितेकडे पाहिलं.
आता ती आग...एका कवीला जाळत होती.
मी अलगद ती चिठ्ठी त्याच्या चितेवर फेकली.
आणि नमस्कार केला.
सूर्य केव्हांच मावळला होता.
आता तो कवी फक्त कवितेच्या रूपाने लोकांच्या मनात जिवंत राहणार होता.
सांजेची छटा क्षितिजावर दिसू लागली होती.
आता मलाही माणसांच्या जगात परत जायचं होतं.
मी उभा राहिलो आणि चालू लागलो मागे न बघता.
चितेने आता मोठयाने पेट घेतली होती.

*दत्तात्रय गुरव.*✍
*संपर्क--८६०५५२३६१८.*
             *७०२८१७५१५८.*


Monday 13 August 2018

आज १३ ऑगस्ट, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म दिवस!
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते.
मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना. धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल.

सारंग पाटील
जिजामाता प्रशाला ,कोंडी
सोलापूर उत्तर 

Thursday 2 November 2017

शासन परिपञके विद्यार्थी हिताचेच

मा.प्राची रविंद्र  साठे
प्रकल्प अधिकारीशिक्षण
 विभाग मंञालय


राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. परखड मतेही व्यक्त केली जातात. मात्र एखाद्या निर्णयाविरुद्ध अविवेकाचे पडघम वाजू लागले, की मात्र त्या निर्णयप्रक्रियेची सत्यता सर्वासमोर आणणे क्रमप्राप्त ठरते. अशाच प्रकारे शालेय विभागाने घेतलेल्या एका निर्णयासाठी हा लेखप्रपंच. कोणत्याही पेशामध्ये त्या व्यक्तीने आपले काम करणे अपेक्षित असते. डॉक्टरने रुग्णाला केवळ तपासणे नाही तर बरे करणेही अपेक्षित असते. वकिलांनी आपल्या अशिलाची बाजू मांडून केस जिंकणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शिकवणे नाही तर त्याचा सर्वागीण विकास करणे अपेक्षित असते. अर्थात या पेशात दोन्ही घटकांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. हे लिहिण्यामागील कारण म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी शासनाने ‘वरिष्ठ निवड श्रेणीचा शिक्षकांसाठी काढलेला अध्यादेश’ होय.

या अध्यादेशामध्ये शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनश्रेणीचा संबंध विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी लावला आहे. वर उदाहरणे दिल्याप्रमाणे हे शिक्षकीपेशातील कामाशी खरे तर सुसंगत आहे. परंतु या निर्णयप्रक्रियेविरुद्ध प्रतिक्रिया आल्या. त्यातील एक प्रतिक्रिया म्हणजे ‘राज्यातील शिक्षकांची बढती आणि वेतनवाढ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी जोडण्याचा उद्योग अशैक्षणिक आहे’ अशी आहे. ही प्रतिक्रिया महाराष्ट्रासारख्या राज्यात विचारवंतांकडून येत असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे.

नोकरी जाण्याच्या भीतीने शिक्षक हवालदिल झाला आहे, त्यामुळे शिक्षकांना गुणवत्तेची कामे देऊ नका असे सुचविणे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणे आहे. या निर्णयामागे दोन वर्षे राबविलेली प्रक्रिया आहे. गेल्या ५-७ वर्षांत शिक्षणक्षेत्राची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय वाचन येत नाही अशा अनेक समस्यांचे आव्हान शासनासमोर होते. या समस्यांचे मूळ हे बालशिक्षण हक्क कायद्यातील नापास न करण्याच्या कलमात आहे, असा सर्वानी समज करून घेतला आहे. अर्थात या कलमाचा अभ्यास करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना त्यामागील ‘योग्य’ भूमिका माहीत आहे. वरील समस्यांचे मूळ शोधण्यापेक्षा या समस्यांवर उपाय शोधून त्या समूळ नाहीशा करण्यासाठी शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून विविध कृती कार्यक्रमातून समस्या निवारणासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

२२ जून २०१५ रोजी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ हा अध्यादेश काढला. मोठय़ा कालावधीनंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गुणवत्तेविषयी मार्गदर्शन यातून करण्यात आले. या अध्यादेशाचे सार ‘१०० टक्के प्रगत शाळा’ याचाच सोपा अर्थ म्हणजे प्रत्येक मूल शिकले पाहिजे, असा साधा सरळ अर्थ आहे. शाळा ही शिकण्यासाठी आहे व शिक्षक हे प्रत्येक मुलाला शिकवण्यासाठी आहेत, हे यातून सूचित केले गेले. मात्र केवळ अध्यादेश काढून शिक्षण विभागाने हात झटकले नाहीत, तर विविध उपक्रमांमधून शिक्षकांना कसे शिकवावे याचे प्रशिक्षण दिले गेले.

सातारा जिल्ह्य़ातील ‘कुमठे’ या बीटमधील ४० शाळांमधील प्रत्येक मूल इयत्तेनुसार अध्ययन क्षमतेत प्रगत आहे. गेली १० वर्षे यशस्वीपणे शाळांची गुणवत्ता उत्तम आहे. या प्रयोगाचे महाराष्ट्रात सार्वत्रिकीकरण करण्यासाठी एक आराखडा तयार केला. चार भिंतींमधील प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवली. उत्कृष्ट शाळा पाहणे, निरीक्षण करणे, तेथील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आत्मसात करणे या उद्देशाने ‘कुमठे शाळा भेटीचे’ नियोजन करण्यात आले. राज्यभरातून ७० ते ८० हजार शिक्षकांनी या शाळांना भेटी दिल्या. शिक्षकांनी तसे प्रयोग आपल्या शाळेत करण्यास सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मरगळ दूर झाली. शिक्षकांमध्ये शाळा १०० टक्के प्रगत होऊ शकते. शिकवण्याच्या प्रक्रियेत बदल केले तर प्रत्येक मूल शिकू शकते हा आत्मविश्वास निर्माण झाला. याचा परिणाम म्हणजे ४३,१७९ इतक्या प्राथमिक शाळा प्रगत झाल्या आहेत. अर्थात या शाळांमधील समस्याग्रस्त तसेच दिव्यांग मूल यामध्ये अपवादात्मकरीत्या अप्रगत असू शकतात.

दुसरा कार्यक्रम हा शिक्षक परिषदा होय. राज्यभरात अनेक ठिकाणी अनेक शिक्षक उत्तम प्रयोग आपल्या शाळेत राबवत आहेत. त्या प्रयोगांची माहिती सर्व शिक्षकांना देण्यासाठी शिक्षक परिषदांचे आयोजन केले गेले. एका ठिकाणी दोन ते चार हजार शिक्षकांना एकत्र करायचे, प्रयोगशील शिक्षकांनी सादरीकरण करायचे, आलेल्या शिक्षकांनी आपल्या समस्या मांडायच्या, त्यावर चर्चा करायची. अशा प्रकारे उत्तम विचारांचे आदान-प्रदान या परिषदांमधून झाले. साधारणत: ७० ते ८० परिषदा महाराष्ट्रात झाल्या. या परिषदांमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष उदाहरणांचे दाखले देऊन मार्गदर्शन मिळाले.

प्रयोगशील शिक्षकांचे प्रयोग एकाच छताखाली बघता यावेत. यासाठी ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऑनलाइन प्रक्रियेतून महाराष्ट्रातील उत्तम ५० प्रयोगांची निवड करण्यात आली. त्या शिक्षकांचे स्टॉल लावण्यात आले. शिक्षकांनी वारीला भेट दिली आणि आपल्या शाळेतील परिस्थितीनुसार कोणता प्रयोग आपल्या शाळेत करता येईल याविषयीचे मार्गदर्शन घेतले. आजपर्यंत गेल्या दोन वर्षांत चार वारींचे आयोजन करण्यात आले. ६० ते ७० हजार शिक्षकांनी वारीला भेट दिली. या वारींमुळे गुणवत्तेची कास धरणाऱ्या शिक्षकांना सन्मान मिळालाच आणि सर्वासमोर आपले प्रयोग मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले. अशा प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षित केले. प्रत्येक मूल शिकण्यासाठी मार्गदर्शन केले. या प्रकारे योजना राबवल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व गुणवत्तेचा संबंध जोडणारा अध्यादेश काढला गेला.

दर वर्षी वेतनवाढ मिळणे हा कदाचित अधिकार असू शकतो. परंतु १२-२४ वर्षांनंतर मिळणारी अतिरिक्त वेतनवाढ हा अधिकार नसावा तर जबाबदार घटकास मिळणारे प्रेरणावेतन असावे असे म्हणणे निश्चितच अशैक्षणिक नाही. वरील सर्व उपक्रमांसाठी १०० ते २०० कोटींपर्यंत निधी दर वर्षीच खर्च होतो. हा खर्च शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केला जातो. असे असताना केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मागणे अशैक्षणिक नसून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेसाठी अत्यावश्यक आहे, हे विचारवंतांनाच नव्हे तर पालक, समाज यांनाही पटण्यासारखे आहे. किंबहुना कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांना दिलेली खरमरीत सूचना आहे. अशा प्रकारे काम न करणाऱ्यांना समज देणे व विविध उपक्रमांतून काम करणाऱ्यांचा सन्मान करणे शिक्षण विभागाचेच नव्हे, तर प्रत्येक विभागाचे कर्तव्य आहे.

याप्रकारे अतिरिक्त वेतनवाढीसाठी शिक्षक शाळांचा खोटा निकाल लावतील अशी भीती निर्माण केली गेली आहे. मुळात इयत्ता दहावीचा निकाल ८० ते ८५ टक्के इतका लागत आहे. म्हणजे या शाळांमधील शिक्षकांना अशी वेतनवाढ मिळण्यात अडचण येणारच नाही. मात्र उरलेल्या १५-२० टक्के शाळांमध्ये निकाल कमी आहे याचा अर्थ तेथील शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. दुसऱ्या अर्थाने त्या शाळेतील मुलांचे नापासांचे प्रमाण जास्त आहे, तेथील अध्ययन-अध्यापन पद्धत सदोष आहे. अशा शिक्षकांनी प्रत्येक मूल शिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असा प्रयत्न शिक्षकांनी करणे हे त्यांच्या पेशाचे कर्तव्य आहे. समाजाला डॉक्टरांनी पेशंटला बरे केलेच पाहिजे असे वाटत असते. मग त्याच न्यायाने शिक्षकांनी प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे असा आग्रह धरणे आणि खोटेपणा करणाऱ्या शिक्षकांना खोटेपणापासून परावृत्त करणे हे पूर्णत: शैक्षणिक आहे आणि शाळेतील प्रत्येक शिक्षकाने शिकवण्याचे काम चोख करणेच अपेक्षित आहे. ढासळत्या शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणेच बोगस विद्यार्थी, बोगस शिक्षकांचा प्रश्न शिक्षणक्षेत्राला भेडसावत होता. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक मागितले गेले. यामुळे बोगस विद्यार्थीसंख्या समोर आली. अर्थात या प्रक्रियेमध्ये मशीन उपलब्ध नसणे, नावात फरक असणे, सव्‍‌र्हर डाऊन असणे अशा समस्यांना निश्चितच सामोरे जावे लागले. मात्र ८५ टक्के आधारजोडणी झाली आहे. पण ४८ लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नाहीत हे खरे नसून त्या विद्यार्थ्यांच्या आधारवरील व शाळेतील नावात फरक आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. निर्णय राबवताना अशा तांत्रिक अडचणी निश्चित येतात, त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असतात. पण असे असताना बोगस विद्यार्थी शोधण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला बासनात गुंडाळा, निर्णय रद्द करा असे विचारवंतांनी म्हणणे धोकादायक आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळांचे मूल्यांकन करून शाळांना श्रेणी देण्यासाठी ‘शाळासिद्धी’ हा कार्यक्रम आणला आहे. यामध्ये भौतिक सुविधांना ३६ गुण व उर्वरित गुण हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक घटकांसाठी आहेत. याचाच अर्थ ब, क, ड श्रेणी मिळवणाऱ्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या घटकांची कमतरता आहे. शिक्षक आपल्या स्वत:च्या पाल्यालाही ‘अ’ श्रेणीचीच शाळा निवडतील, मग आपण शिकवत असलेल्या शाळेच्या ‘अ’ दर्जासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा करणे नैसर्गिक आहे.

सरतेशेवटी प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्या विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्या विद्यार्थ्यांला शिक्षकीपेशा स्वीकारल्यानंतर शिक्षित करणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. शेवटी गुणवत्ता आणि अतिरिक्त श्रेणी वेतनाचा संबंध बादरायण नसून तो अत्यंत स्वाभाविक व सरळ आहे, हे स्वीकारणेच शैक्षणिक आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे!
प्राची रवींद्र साठे     
संदर्भ- cpd विभाग विद्याप्राधिकरण पुणे

                            *पाठदुखी वर उपाय आणि आहार*  *१) नीट झोपा* – पाठदुखी असलेल्या माणसांना नीट झोप लागत नाही. जेव्हा ...